Indian Navy च्या ताफ्यात आता 'INS Malvan'; पाणबुडीविरोधी युद्धनौकेचं कोचीनमध्ये जलावतरण

Payal Bhegade
02 Dec 2023
Blog

मालवण : येथील तारकर्ली किनारी सोमवारी (ता. ४) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नौदल दिन साजरा होत आहे. या सोहळ्याच्या पूर्वीच नौदलाने मालवणाचा सन्मान केला आहे. मालवण नावाच्या पाणबुडीविरोधी युद्धनौकेचे काल (ता. ३०) कोचीन येथे जलावतरण करण्यात आले.
नौदलाने ताफ्यात दाखल करून घेतल्यानंतर ‘आयएनएस मालवण’, अशी ओळख असणारी पाणबुडीविरोधी युद्ध नौका असणार आहे. अशा नोकांची नौदलाला गरज होती. या नौका उभारणीचे कंत्राट कोचीन शिपयार्ड लिमिटेड या कंपनीला दिले आहे. त्यातीलच मालवणसह अन्य दोन युद्ध नौकांचे काल जलावतरण झाले.
कोचीन शिपयार्डमध्ये अशा प्रकारे आठ युद्ध नौकांची बांधणी होत आहे. यापैकी तीन नौकांची बांधणी पूर्ण झाली असून त्यांचे काल एकाच वेळी जलावतरण झाले. या तीन नौकांची नावे ‘मालवण’, ‘मंगरोल’ व ‘माहे’, अशी आहेत. ‘मंगरोल’ हे शहर गुजरातच्या किनारपट्टीवर तर ‘माहे’, हे केरळ जवळील समुद्रकिनारी असलेले शहर आहे. तिन्ही युद्ध नौकांची नावे समुद्रकिनारी असलेल्या शहरांची दिली आहेत,अशी माहिती नौदलाकडून देण्यात आली.
‘मालवण’चे जलावतरण दक्षिण कमांडचे प्रमुख व्हाईस अॅडमिरल सूरज बेरी यांच्या पत्नी कंगना बेरी यांच्या हस्ते तर ‘मंगरोल’चे जलावतरण उपनौदल प्रमुख व्हाईस अॅडमिरल संजय सिंह यांच्या पत्नी झरीन लॉर्ड सिंह यांच्या हस्ते तर ‘माहे’चे जलावतरण भारतीय नौदल अकादमीचे प्रमुख व्हाईस अॅडमिरल पुनीत बहल यांच्या पत्नी अंजली बहल यांच्या हस्ते झाले.