कोकणातील पहिले कुस्‍ती प्रशिक्षण केंद्र

Payal Bhegade
25 Nov 2023
Sports

रायगड : वाडगावात होणार कोकणातील पहिले कुस्‍ती प्रशिक्षण केंद्र
अलिबाग : अलिबाग तालुक्‍यातील वाडगाव येथे कुस्‍ती प्रशिक्षण केंद्र सुरू करण्‍यात येणार आहे. हे कोकणातील पहिले कुस्‍ती प्रशिक्षण केंद्र असेल. या कामासाठी तत्कालीन खासदार यांनी आपल्‍या खासदार निधीतून स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत ५० लाख रूपयांचा निधी उपलब्‍ध करून दिला आहे. त्‍यामुळे कुस्‍ती खेळाला कोकणात आगामी काळात चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.

कुस्‍ती म्‍हटले की आठवतो पश्चिम महाराष्‍ट्र, तेथील लाल मातीत रंगणारा कुस्‍तीचा फड, पैलवानांना घडवणारया तालमी. कोकणात कुस्‍तीच्‍या खेळाला फारसे महत्‍व दिसत नाही. असे असले तरी रायगड जिल्‍हयातील काही तालुक्‍यांमध्‍ये कुस्‍तीच्‍या स्‍पर्धा भरवल्‍या जातात. परंतु त्‍यांचे स्‍वरूप छोटेखानी असते. नारळी पौर्णिमेला अलिबाग तालुक्‍यातील मांडवा येथे समुद्राच्‍या वाळूवर रंगणारी कुस्‍ती स्‍पर्धा गेली अनेक वर्षे सुरू आहे. या स्‍पर्धेत राज्‍यस्‍तरावरील पैलवान आणि तालमी सहभागी होत असतात. या शिवाय वेगवेगळे उत्‍सव जत्रा यांच्‍या निमित्‍ताने जिल्‍हयाच्‍या विविध भागात कुस्‍ती स्‍पर्धा होत असतात.

कोकणात कुस्‍ती या खेळाला क्रीडा प्रकार म्‍हणून महत्‍व मिळाले नाहीच परंतु आजवर राजाश्रय देखील मिळाला नव्‍हता परंतु त्‍याची मुहुर्तमेढ आता रोवली जात आहे. अलिबाग तालुका कुस्‍तीगीर संघाचे अध्‍यक्ष आणि जय हनुमान तालीम संघाचे जयेंद्र भगत यांनी आता यासाठी पुढाकार घेतला आहे.

नवीन खेळाडूना प्रशिक्षणाची उणीव भासते आहे याची जाणीव जयेंद्र भगत यांना होती. नवीन पिढीला कुस्‍ती खेळाविषयी तंत्रशुदध माहिती व्‍हावी, योग्‍य मार्गदर्शन व्‍हावे, या खेळाबददल आवड निर्माण व्‍हावी यासाठी गेली अनेक वर्षे त्‍यांचे प्रयत्‍न सुरू आहेत. त्‍यांच्‍या या प्रयत्‍नांना खासदार सुनील तटकरे यांचा सक्रीय पाठींबा मिळाला आहे. कुस्‍ती प्रशिक्षण केंद्रासाठी निधी मिळावा अशी मागणी जयेंद्र भगत यांनी तत्कालीन खासदार यांच्याकडे केली होती. त्‍यांची मागणी तात्‍काळ मान्‍य करत आपल्‍या खासदार निधीतून व्‍यायामशाळेसाठी ५० लाख रूपयांचा निधी उपलब्‍ध करून दिला आहे. त्‍याचे पत्रदेखील नुकतेच तटकरे यांनी जयेंद्र भगत यांच्‍याकडे सुपूर्द केले.