रसाळगड

Payal Bhegade
19 Apr 2024
Fort

महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील गिरिदुर्ग. हा खेड तालुक्यामध्ये असून त्याची उंची समुद्रसपाटीपासून ५२२ मी. आहे. खेडपासून निमणी या गावामार्गे डांबरी रस्ता थेट गडाच्या पायऱ्यांपर्यंत जातो.

निमणी गावाजवळ डोंगर उतारावर पेठवाडी नावाचे छोटे गाव आहे. निमणी, पेठवाडी, झापाडी ही सर्व गावे घेरा रसाळगडमध्ये येतात. पेठवाडीमधून पायऱ्यांमार्गे गडाच्या पहिल्या दरवाजाजवळ पोहोचता येते. दरवाजाच्या डावीकडील बुरुजाच्या खालील भागात खडकात खोदलेली पाण्याची तीन टाकी आहेत. दरवाजा सध्या दगड रचून नव्याने बांधल्याचे दिसतो. या उत्तराभिमुख दरवाजातून पायऱ्यांची वाट पुढे दुसऱ्या दरवाजाकडे जाते. पहिल्या आणि दुसऱ्या दरवाजाच्या दरम्यान हनुमानाची मूर्ती आहे. या मूर्तीतील हनुमानाच्या कमरेवर खंजीर असून ओठावर मिशा दर्शविल्या आहेत. घुमटीतील मारुती शिल्पापासून पुढे गेल्यावर दोन बुरुजांमध्ये बांधलेला दरवाजा व त्यावर जंग्या (लहान खिडक्या) आहेत. हा दरवाजा देखील उत्तराभिमुखच आहे. या दरवाजातून आत गेल्यावर पायऱ्यांच्या वाटेने, माथा उजवीकडे ठेवत तिसऱ्या दरवाजात पोहोचता येते. तिसऱ्या दरवाजाची कमान आज अस्तित्वात नाही.

माथ्यावर प्रवेश केल्यावर उजवीकडे एक छोटा तलाव व दरवाजासमोरच आणखी एक तलाव दिसतो. दोन तलावांच्या मधल्या भागात एक तोफ असून ती गंजलेल्या स्थितीत आहे. तिसऱ्या दरवाजातून प्रवेश केल्यावर डावीकडील म्हणजे पूर्वेकडील तटाजवळ एक मोठी तोफ आहे. माथ्यावर उत्तरेकडील टोकाकडे एक मोठा चौथरा असून त्यावर एक कबरसदृश्य बांधकाम आहे. त्या शेजारील बुरुजावर एक लहान तोफ आहे. गडाच्या दक्षिणेकडील वाटेत दोन तोफा आहेत. यांपैकी एक मातीमध्ये गाडल्याची दिसते. पुढे झोलाई मंदिरामागील वाड्याच्या तटावर दोन ब्रिटिश बनावटीच्या तोफा दिसतात. गडावरील सर्वांत मोठी वास्तू म्हणजे झोलाई मंदिर. मंदिराचे नुतनीकरण झाल्याचे दिसते. मंदिरात झोलाईदेवी, नवचंडी, शिवपार्वती, भैरव इत्यादी मूर्ती आहेत. पेठवाडी गावातील सकपाळ हे या देवीचे गुरव असून ते कान्होजी आंग्रे यांचे वंशज असल्याचे सांगतात. आंग्रे यांचे मूळ आडनाव सकपाळ होते.

मंदिराबाहेरील ओसरीवर दोन उखळी तोफा ठेवलेल्या आहेत. मंदिरासमोर भव्य दीपमाळ आहे; पण ही दीपमाळ सध्या नव्याने बांधलेली दिसते. त्या मागे बगाड करण्यासाठी नवीन पद्धतीने बांधलेला मनोरा आहे. मंदिराशेजारी दोन छोटे तलाव आहेत. त्यांपैकी एका तलावात बारमाही पाणी असते. या तलावाला लागूनच मोठा चौबुरजी वाडा आहे. वाड्याच्या मधोमध मोठे जोते आहे. या शिवाय वाड्यातील एका बुरुजावर तीन तोफा ठेवलेल्या आहेत. वाड्यापासून दक्षिणेकडे वाटेत एक तोफ आहे. दक्षिण टोकाकडे गडापासून वेगळी झालेली एक छोटी टेकडी आहे. दक्षिण टोकाकडून पूर्वेकडे वाटेत एक कोरडा तलाव आहे. तसेच एक कोठार चांगल्या स्थितीत असल्याचे दिसते. कोठार्‍याबाहेर समोरच एक तोफ उभी जमिनीत गाडलेली आहे. तसेच शेजारीच एका जोत्याजवळ एक तोफ आहे. ही गडावरील पंधरावी तोफ आहे. कोठार्‍यासमोरील तटावर सोळावी तोफ असून शेजारीच एक कोरडा तलाव आहे. गडाच्या पूर्वटोकाकडे एका कड्याजवळ एक नंदी व शिवलिंग दिसते. पूर्वटोकाकडे जाताना एका खोलगट भागात तीन समाधीसदृश्य शिळा रचलेल्या आहेत. यांपैकी एक समाधी अलिबाग येथील कान्होजी आंग्रे यांच्या समाधी परिसरातील एका छोट्या समाधीशी मिळतीजुळती आहे. पूर्वटोकाकडून ५० मी. खाली उतरल्यास एक खांबटाके व टाक्याशेजारीच एक तोफ दिसून येते. या टाक्याच्या भिंतीवर श्रीगणेशाची प्रतिमा कोरलेली आहे. टाक्याच्या खांबांवर उत्तम कोरीव काम केलेले दिसते. या खांबांच्या कोरीव कामावरून हे टाके किल्ला बांधण्यापूर्वीचे असावे. कदाचित हे लेणे असण्याची शक्यता आहे. गडाच्या उत्तरपूर्वेकडील तटावरून मुख्य दरवाजाकडे येताना वाटेत गडावरील शेवटची म्हणजेच अठरावी तोफ आहे. गडावर बांधकामाची अनेक जोती ठिकठिकाणी दिसून येतात. अंदाजे २० वर्षांपूर्वी या किल्ल्यावर २५ पेक्षा जास्त तोफा होत्या; तथापि सध्या फक्त १८ तोफा दिसतात.

या किल्ल्याच्या बांधणीवरून हा किल्ला छ. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत दुरुस्त केला असावा. छ. शिवाजी महाराजांच्या काळात किल्ल्यावर मोठी लढाई किंवा ऐतिहासिक घटना झाल्याची नोंद मिळत नाही. जंजिरेकर सिद्दी विरुद्ध इ. स. १७३३ साली मराठ्यांनी उघडलेल्या मोहिमेच्या वेळी संभाजी आंग्रे बाणकोट येथे होते. तेथून ते कुलाब्याला न जाता रसाळगडवर जाणार होते, अशी माहिती आंग्रे शकावलीमध्ये शं. ना. जोशी देतात. सप्टेंबर १७३३ मध्ये संभाजी आंग्रे रसाळगडावर येऊन गेले होते. १० एप्रिल १७३४ रोजी रसाळगडचे नामजाद तानाजी नाईक चाळके यांनी मराठ्यांचे आध्यात्मिक गुरू ब्रह्मेंद्रस्वामी यांना १५६ मोहरा, ५७ पुतळ्या, रुपये ६६१५ व ६ तोळे सोने पाठविले. १६ मे १७५५ रोजी गणेश कृष्ण पेंडसे यांनी रूमाजी दाभोळकर यांना लिहिलेल्या पत्रानुसार पेशव्यांचे सरदार रामाजी महादेव यांनी आंग्य्रांकडून सात किल्ले जिंकून घेतले, त्यांत रसाळगड होता.