निसर्गाने कोकणाला भरभरून दिलंय

Payal Bhegade
17 May 2024
Blog

कोरोनाच संकट पार केलं की देशासमोर लगेचच उभं राहिल ते आर्थिक संकट. हे संकट परतवून लावताना अनेकांना नोकऱ्या जाण्याची भीती आता सतावू लागलीय त्याच पार्श्वभूमीवर नोकरिव्यतिरिक्त कोकणातील शेतीकडे पाहण्याचा आजच्या तरुणाईचा दृष्टिकोन काय असेल? कोकणातील इतर रोजगाराच्या संधी? त्याचा घेतलेला हा मागोवा.
निसर्गाने कोकणाला भरभरून दिलंय असं आपण नेहमी ऐकत असतो. पण खरच या निसर्गाचा कोकणातील शेतीला फायदा झाला आहे का? तर मी नाही म्हणेन. कारण आपण त्याचा फायदा करून घेतला नाही. घाटमाथ्यावर निसर्ग शेतीसाठी अनुकूल नसतानाही तेथील शेतकरी निसर्गाशी झगडून शेतीमध्ये प्रगती करतोय. तर कोकणातील शेतकरी प्रगती तर सोडाच जे आहे ते टिकवण्यासाठी तसूभरही मेहनत घेत नाही आहे आणि हेच सत्य आहे. म्हणजे पहा ना पूर्वी बाराही महिने हिरवागार दिसणारा मळा आज फक्त पावसाळ्यात तेवढा हिरवा असतो बाकी गुरे मोकळी सोडली तर त्यामागे राखणा ठेवायचीही गरज नाही एवढा ओसाड असतो.
खरतर कोकणात सगळं पिकतं. सगळी कडधान्य, डाळी, पालेभाज्या, फळभाज्या, ऊस, तांदूळ, नाचणी, मका अगदी कांदासुद्धा पिकतो पण आंबा सोडल्यास आपण काहीच निर्यात करत नाही. एवढी माडाची झाडं असून नारळही आपण निर्यात करू शकत नाही. अस का होतं? त्यामागे बरीच कारणे आहेत.
१)शेतीसाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागतात हा गैरसमज:- खरतर आता ज्या मुलांनी शेती केली पाहिजे ते नोकरी करतात पण कधीकाळी त्यांनी शेती जवळून पहिली होती आणि त्यावेळी त्यांच्या आईवडिलांनी उपसलेले ते कस्ट, ती मेहनत आजही त्यांच्या मनात घर करून आहे. आणि खरंच त्या वेळी अंगमेहनत आजच्यापेक्षा जास्त होती कारण 'कोळंब्याने' दिवसभर शेतीसाठी विहिरीतून पाणी उपसावे लागायचे पण आता तस नाही आहे आता इंजन आलंय. पूर्वी बैल किंवा रेड्यांच्या साहाय्याने नांगरणी केली जायची आता ट्रॅक्टर च्या साहाय्याने केली जाते, त्यामुळे बराच वेळ वाचतो. भात कापायची, रान काढायची, माड चढायची अश्या अनेक मशिन्स आल्या आहेत. स्वतःच्या नसल्या तरी भाड्याने मिळतात. त्यामुळे नक्कीच मेहनत कमी झालीय. शिवाय जास्त माणसांचं काम कमी वेळात होतं हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे शेतीसाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागतात ही गोष्ट मनातून काढून टाकणे गरजेचे आहे.
२) शेतविहिरींना पाणी नसणे:- सध्याच्या काळात कोकणात भातशेतीव्यतिरिक्त काहीच पिकवलं जात नाही(काही अपवाद सोडले तर). त्यामागे बऱ्याचवेळा हे कारण दिलं जातं की पाणी नाही आहे. कारण जरी बरोबर असलं तरी तेवढं ते पटत नाही. खरतर कोकणातील पाण्याची पातळी वर्षानुवर्षे आहे तेवढीच आहे. आणि कोकणात जर शेतीला पाणी मिळत नसेल तर महाराष्ट्रात इतर ठिकाणी शेतीच केली जाऊ नये असं मला वाटतं. पण इतर महाराष्ट्रात कृत्रिम शेततळे करूनसुद्धा शेती केली जाते ही खूप महत्त्वाची आणि विचार करायला लावणारी गोष्ट आहे. आपल्याकडे कोकणात ज्या शेतविहिरी असतात त्याला आपण 'डुरके' म्हणतो. ते व्यवस्थित बांधलेले नसतात. त्यामुळे ते ढासळतात, तळाशी गाळ(चिखल) जमा होतो. आणि तो गाळ उपसला नाही तर साचत जातो व काही वर्षांनी ते डुरके हुरतात(बुजतात). असे अनेक हुरलेले डुरके मी पाहिले आहेत. आता गाळ का उपसला जात नाही याच कारण आहे इंजन(पंप). कारण 'कोळंब्याने' पाणी उपसताना शेतकऱ्याला समजायचं किती पाणी आहे? गाळ आहे का? पण इंजिन आल्यापासून विहिरीत डोकावून बघण्याचा त्रासही कोणी घेत नाही. अगदी त्या इंजन चा पाईप खोल चिखलात रुतला तरी समजत नाही. इंजनाने पाणी खेचायच बंद झालं की इंजन बंद करायचं आणि घरी निघून जायचं. "उरलेलं उद्या लावू(शिपु) ही वृत्ती". कारण मेहनत तर नाही आहे, फक्त इंजिनाला दोरीच खेचायची आहे मग आज लावलं काय किंवा उद्या लावलं काय.
खरतर पूर्वी डुरके उपसायचे असले की मुलांमध्ये आनंदी वातावरण असायचे. कारण चिखलात खेळायला मिळायचे आणि 'ठिगुर, बेलकाटा' असे छोटे छोटे मासे पकडायला मिळायचे. "कामात आनंद शोधला की काम सोपं होतं, हलकं वाटायला लागतं". याची अनेक उदाहरणं देता येतील. जसं की मळणी घालताना अंगाला खाज आली तरी गवतात उड्या मारून दिवसभर मळणीपाठोपाठ फिरण्याची मजा. किंवा नांगरणी झाल्यावर जमिनीची लेव्हल करण्यासाठी गुठा घालतात त्यावर लहान मुलाला बसवून फिरवणे. गुठ्यावर बसायला मिळणार या आशेवर अनेक लहान मुलं दिवसभर रान काढायची, ढेपळं फोडायची. अजून एक गंमत असायची ती म्हणजे भुईमूग लावण्या आधी शेंगा फोडताना आमचे वडील सांगायचे छोटे दाणे मुलांनी खायचे. त्यामुळे आपोआपच जास्तीत जास्त छोटे दाणे मिळवण्यासाठी जास्तीत जास्त शेंगा फोडल्या जायच्या. अश्या अनेक गमती जमती गावी शेती करताना अनुभवायला मिळायच्या.
बऱ्याच ठिकाणी सरकारने शेतविहिरी बांधून दिल्या पण त्याचा उपयोग पिण्याच्या पाण्यासाठी केला जातो याकडेही लक्ष दिलं पाहिजे.
आता कोकणात बऱ्याच ठिकाणी उसाची लागवड केली जाते. कारण ऊस लागवडीमध्ये शेतकऱ्याला जास्त मेहनत नसते शिवाय जास्त उत्पन्न मिळतं. जी काही मेहनत असते ती कारखान्याची ऊस घेऊन जाणारी माणसं करतात. त्यामुळे ऊस लागवड करण्याकडे जास्त शेतकऱ्यांचा कल आहे. उसाला मोठ्या प्रमाणात पाणी लागतं. त्यामुळे भविष्यात कोकणात पाण्याची पातळी खालावली जाऊ शकते हे मात्र नक्की.
३)जंगली पशुपक्षांकरवी नासधूस:-
"केडली, वांडर, डुकर काय ठेवनत नाय". किंवा सूर्यफूल असेल तर "पोपट काय ठेवनत नाय". असं वारंवार गावच्या शेतकऱ्यांकडून ऐकण्यात येत. जंगली पशुपक्षांनी शेतीची नासधूस करणे हे काही नवीन नाही आहे. फक्त आपण योग्यप्रकारे शेतीची राखण करण्यास असमर्थ आहोत असच मला वाटतं. याच कारण म्हणजे पूर्वी शेतात 'बुजगावणे' लावले जायचे. ते आता फार कमी दिसतात. शेतातील खोपी गायब झाल्या. कारण खोपित झोपायला जाणाऱ्यांची संख्या कमी झाली. खोपित झोपणे बंद झालं कारण घरी टीव्ही आला आणि आता मोबाईल असला तरी उशाला चार्जर चं कनेक्शन हवे असणारे आपण, आपल्याला खोपीची ओढ कशी असणार. खरतर खोपितली गम्मत वेगळीच आहे. कैरीचं लोणचं असेल, मेंढीकोटचा डाव असेल, परीक्षेचा अभ्यास असेल किंवा गावातील नाटकाचं पाठांतर असेल. खोपीने हे सगळं पाहिलंय. ती खोप आता रिकामी झालीय म्हणून जंगली पशुपक्षी वाढले बाकी जंगलतोड वगरे ही कारणं तेवढी पूरक वाटत नाहीत. खरंतर जंगली पशुपक्षांपासून शेतीचे संरक्षण करण्यासाठीची आपल्याकडे पूर्वी वापरात असलेली जुनी अवजार आपण विसरलो. भेडल्या माडाच्या कामटा पासून बनवलेली बंदूक, गोफ, माडाचा पिढा जमिनीवर आपटून केलेला मोठा आवाज किंवा टेपच्या जुन्या कॅसेट च्या पट्ट्या संपूर्ण कोपऱ्या भोवती फिरवून ठेवल्यावर वाऱ्यासोबतचा त्याचा तो आवाज. अश्या अनेक गोष्टी आपण विसरलो. बाकी तेलाचा डबा बडवण्यासारखी मज्जा कशातच नाही. मालकच आळशी झालाय त्यामुळे कुत्र्याचं मी नाव घेणार नाही. याव्यतिरिक्त शिरडांचं कुंपण आपण विसरलो. बसच्या घंटे सारख पत्र्याचा डबा झाडावर लावून त्यात करवंटी टाकून त्याची दोरी खोपित बसून ओढायची ही केवढी मोठी क्रिएटिव्हिटी होती. आता तर आवाज करून प्राण्यांना पळवून लावणारी विविध मशिन्स बाजारात आली आहेत त्याचा उपयोग आपण करू शकतो.
४)तुकड्या तुकड्या ची किंवा सामायिक शेती:-
ही पण काही नवीन गोष्ट नाही आहे. कोकणात कोपऱ्याची शेती ही परंपरागत चालत आलेली आहे. पूर्वीही कोपरेच होते आणि यापुढेही कोपरेच राहतील. उलट पूर्वी राबणारी आणि खाणारी तोंड जास्त होती तरीही त्या शेतीत सगळं भागायच. नुसतं भागायच नाही तर बाजाराला माल जायचा. आज शेतजमीन तेवढीच आहे उलट माणसं कमी झाली आहेत. माणसं कमी झाली आहेत म्हटल्यावर पैरी मिळत नाहीत असा प्रश्न उपस्थित होतो. पण तो ही प्रश्न वरवरचा वाटतो कारण माणसांची जागा मशीन ने घेतली आहे.
पूर्वी ज्यांची जमीन नाही आहे ते सुद्धा खंडाने घेऊन शेती करायचे आणि त्यातही त्यांचं भागायच. कारण त्यावेळी शेतीशिवाय पर्यायच नव्हता. पूर्वी वाडीतील दोन तीन शेतकरी एकत्र येऊन 'वाट्याक' शेती करायचे ते आपण विसरलो. ते पुन्हा झालं तर शेती फायद्याची आहे. एकत्र मिळून शेती केली तर जमीन पण मोठी वाटते आणि राबणारे हात पण वाढतात.
अजून काही करणं आहेत ज्यामुळे शेती कमी झाली. यातील प्रमुख कारण म्हणजे सरकारकडून मिळणार रेशन. अगदी स्वस्त आणि मुबलक प्रमाणात रेशन मिळत जे महिनाभर पुरून उरतं. काहीजण उरलेलं रेशन विकतात आणि त्यातून आलेल्या पैशातून इतर बाजारहाट करतात.
त्यामुळे रेशनिंग चा गोरा तांदूळ खाऊन माणूस आळशी झालाय आणि गहू मिळत असल्यामुळे नाचणी पिकवली जात नाही त्यामुळे चपात्या खाऊन त्याने अनेक आजार ओढवून घेतले आहेत असच म्हणावं लागेल.
या सगळ्यात काही शेतकरी मात्र अजूनही मन लावून शेती करतात तर काही फक्त 'म्यार राखण्यासाठी' एक वर्ष पड ठेऊन शेती करतात. त्यांना भीती असते सलग पड ठेवली तर शेजारचा खापाऊन खापाऊन आपली जमीन बळकावेल.
जे प्रामाणिकपणे शेती करतात त्यांना मुख्य बाजारपेठेत पोचायला अजूनही जमत नाही आहे. त्यामुळे शेती करूनही त्यांच्या पदरात काहीच पडत नाही आहे.
उदा. एक शेतकरी 1000किलो भात पिकवतो. ते भात तो सरकारला विकतो 18 ते 20 रुपये प्रति किलो दराने. म्हणजे त्याचा संपूर्ण व्यवहार 20हजार रुपये मध्ये होतो. आता ते 20 हजार मिळवण्यासाठी कमीतकमी 4 माणसं 2 महिने मेहनत घेतात. आता निर्मिती खर्च वजा केला तर त्यांच्या हातात काय राहत ते त्यांचं त्यांनाच माहीत.
कधीकधी सरकारी अधिकारी अडून दाखवतात. मग तोच माल व्यापारी 11 ते 12 रुपये प्रति किलोने घेतो. किंवा जेवढे किलो भात घेतो तेवढे किलो सुरय(रेशनचे) तांदूळ देतो. म्हणजे सोनं घेऊन विष देतो.
आपला शेतकरी उकडा तांदूळ ग्रामीण बाजारपेठेत 50 ते 60 रुपये प्रति किलोने विकतो. तोच तांदूळ लालबागच्या बाजारात 110 ते 150 रुपये प्रति किलो असतो. तर तोच तांदूळ ऑनलाइन 200 ते 400 रुपये प्रति किलो असतो.
ही दरी मिठवायला हवी.
बाकी कोकणात करण्यासारखं खूप काही आहे. खुप रतांबे पडून जातात, कैऱ्या, बोंडू पडून जातात. विकायला गेलं तर माडाच्या विणलेल्या झावळ्या, पिडे, झाडू, काथा, गोवऱ्या, गोमूत्र, गोबर सगळं आहे पण कच्या मालावर प्रक्रिया करणारे कारखाने नाहीत आणि बाजारपेठेत कस पोचायचं ते माहीत नाही.
बाकी दुग्ध व्यवसाय, कुकुटपालन, शेळी पालन... असे शेतीपूरक जोड व्यवसाय केले तर सोने पे सुहागा आणि मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण, नुकतीच चालू झालेली जलवाहतूक, पूर्णत्वास येत असलेले चिपी विमानतळ यामुळे पर्यटन व्यवसायास नक्कीच चालना मिळेल. याव्यतिरिक्त गेल्या काही वर्षात कोकणात झालेली हॉस्पिटल्स, हॉटेल्स, बँक्स, शाळा-कॉलेजेस, पोस्ट ऑफिसमध्ये असणाऱ्या विविध रोजगाराच्या संधी पदरी पाडून घ्यायच्या असतील तर या लॉकडाऊन नंतर गावी जाणेच उचित.