कोकणातील रानभाजी भारंगी

Payal Bhegade
19 Jul 2023
Food

भारंगी

कोकणात पावसाळ्यात सर्वत्र आढळणारी ही रानभाजी आहे. भारंगीचे झुडूप दोन ते तीन मीटर उंचीपर्यंत वाढते. पावसाळ्याच्या सुरुवातीस शुष्क काटक्यांच्या रुपात असलेल्या भारंगीला कोवळी पाने व नवीन तुरे फुटतात. लांबट गोलाकार कात्र्यांच्या कडा असलेली पाने जंगलात शोधून खुडावी लागतात. भारंगीची भाजी गोळा करण्यासाठी जंगलात फिरावे लागते. एकाच झाडावर अशी मुबलक भाजी मिळत नाही. पावसाळ्याच्या सुरुवातीस फुटलेले कोवळ्या पानांचे तुरे खाण्यासाठी योग्य असतात. हे कोवळे तुरे घरी आणून व स्वच्छ धुवून इतर पालेभाज्यांचीच पाकक्रिया वापरून भारंगीची सुकी भाजी करतात. भारंगीच्या भाजीत चणाडाळ वापरल्यास ही पालेभाजी अधिक चविष्ट लागते. पावसाळ्यात एकदा भारंगीच्या झुडूपाला कोवळी पाने आल्यावर पुढचे दोन महिने असे वरचेवर फुटणारे कोवळ्या पानांचे तुरे खुडून आपण भारंगीची भाजी खाऊ शकतो. भारंगीच्या भाजीलाही खूप छान सुवास येतो. भारंगीची भाजी शिजवल्यावर केवळ वासानेच ओळखणारे अनेकजण आहेत. इतर पालेभाज्यांची पाकक्रिया वापरून भारंगीची सुकी भाजी करतात. टोपातल्या भाजीपेक्षा लोखंडी तव्यावर परतून शिजवलेली भारंगीची भाजी अधिक रुचकर लागते. भारंगीची भाजी चवदार आहेच, शिवाय विविध औषधी गुणधर्मांनी युक्त आहे. भारंगीची भाजी वात विकारांवर खूप गुणकारी आहे. भाद्रपदात या भारंगीला गर्द जांभळ्या व पांढरट रंगाच्या फुलांचे तुरे येतात. भारंगीच्या फुलांचीही भाजी खूप रुचकर लागते. भारंगीच्या फुलांचीही शेवग्याच्या फुलांच्या भाजीची पाकक्रिया वापरून भाजी करतात. फुलांची भाजीही खूप खमंग व चवदार असते. दिवाळीच्या अखेरीस भारंगीची पाने गळून पडतात. पुढील पावसाळ्यापर्यंत मग भारंगीच्या केवळ काटक्या जीवंत राहतात. मात्र पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही भारंगी परत हिरवीगार होते.