कोकणातील रानभाजी अळू

Payal Bhegade
19 Jul 2023
Food

अळू( तेरी )
पावसाळ्यात आवडीने खाल्ली जाणारी ही लोकप्रिय रानभाजी आहे. उन्हाळ्यात निद्रिस्त असलेल्या तेरीच्या जमिनीत असलेल्या कांदेवजा गुठळ्यांना पावसाळ्याच्या सुरुवातीस कोंब येतात. कोंब जमिनीबाहेर आले की पहिले पान उगवते. गोलाकार आकाराचे लांब देठाला आलेले पान हिरवट काळसर व छान नक्षीयुक्त असते. हे पहिले पान खूडून आणल्यावर स्वच्छ धुतात. कोकणात सर्वत्र सहज उपलब्ध होणारी ही रानभाजी आहे. या भाजीसाठी जंगल तुडवावे लागत नाही. घराजवळच्या पडीक जागेत, पडीक जमिनीत पायवाटेच्या दुतर्फा व शेताच्या बाजूस हे अळू आपोआपच उगवते. देठ व पान खुडून मोकळे केल्यावर देठाची पातळ पापुद्र्यासारखी साल सोलून काढतात. अळू पासून पातळ भाजी, गाठींची भाजी, अळुवड्या करतात. अळूच्या भाजीत निसर्गतःच थोडी खाज असते. भाजी शिजवताना भाजीत कोकम किंवा चिंच टाकल्यास अशी खाज निघून जाते. अळूची पातळ भाजीही खूप रुचकर व चविष्ट लागते. पातळ भाजीत शेंगदाणे, पावटा, चवळी, चणे किंवा फणसाच्या आठळ्याही सोलून टाकतात. असे काही टाकल्यावर अळुच्या पातळ भाजीची लज्जत अधिक वाढते. पुर्वी कोकणात गरीबीचे प्रमाण जास्त असताना पावसाळ्यात अशा अळूच्या पानांच्या गाठी उकडून त्या पोटभर खात असत. काळसर झाक असलेल्या अळूची घराच्या परसात लागवडही करतात. अशा लावलेल्या अळूच्या अळूवड्या छान व रुचकर असतात. मात्र जंगलात किंवा शेताच्या कडेला पावसाळ्यात आपोआप उगवणाऱ्या अळूची पाने किंचित पोपटी रंगाची व गोलाकार असतात. अशा जंगली अळूला तेरी म्हणतात. ही तेरी अतिशय चविष्ट रानभाजी आहे. पुर्वी तेरीची पाने गुंडाळून त्यांची सुरळी करून त्याची गाठ बांधत अशा गाठी मीठ, मसाला व इतर आवश्यक घटक टाकून शिजवून खात असत. आजही काहीजण अशा अळूगाठी आवर्जून उकडून खातात. पावसाळ्यात सर्वत्र सहज आढळणारी ही रानभाजी आहे. पावसाळ्यात दोन ते तीन महिन्यांपर्यंत अळूची भाजी खाण्यास योग्य असते. पावसाळ्यानंतर या अळूला एक उंच देठाचे आकर्षक फूल येते. फूल कोमेजून सुकल्यावर अळूची पानेही सूकून जातात. अळूचे कंद मग पुढील पावसाळ्यापर्यंत जमिनीत निद्रिस्त रुपात जीवंत राहतात.