कोकणातील रानभाजी कार्टुली/करटोली

Payal Bhegade
19 Jul 2023
Food

कार्टुली/करटोली

कार्टुलीला रानकारली असेही म्हणतात. कातळवजा व खडकाळ परिसरात ही रानभाजी सर्वत्र आढळते. कार्टुलीच्या वेलीची पाने, फुले व फळेही कारल्यासारखीच असतात. फळे कारल्यापेक्षा खूप छोट्या आकाराची असतात. हिरवीगार गोमटी कार्टुली बघायलाही छान दिसतात. कोकणातील सर्वच जंगली भागांतल्या खडकाळ भागात ही रानभाजी मिळते. कोकणात या भाजीला काटला व फागूल या नावांनीही संबोधले जाते. पावसाळ्याची चाहूल लागताच मधल्या काळात जमिनीखाली निद्रिस्त असलेल्या कार्टुलीच्या कांद्यास कोंब फुटतात. साधारण पंधरवड्यातच या कोंबांचे छान वेल तयार होऊन पानाफुलांनी बहरतात. वाढलेले वेल खडकावर किंवा लगतच्या झुडुपावर पसरतात. प्रत्येक पानाच्या देठात एकेक कार्टुलीची छोटी कात तयार होते. आठवडाभरात ती फुलून छान कार्टुली वाढतात. पूर्ण वाढ झालेल्या पण कोवळ्या कार्टुल्यांची भाजी करतात. एका वेलीवर साधारण आठ दहा कार्टुली एका वेळेस मिळतात. भाजीसाठीची अशी कार्टुली गोळा करण्यासाठी जंगलात थोडी भटकंती करावी लागते. जंगलात फिरताना कार्टुलीच्या वेलावरची आकर्षक पिवळी फुले दुरुनच कार्टुलीच्या वेलाची जागा दाखवतात. हिरवीगार कार्टुली घरी आणल्यावर स्वच्छ धुवून उभी आडवी कापून एका कार्टुल्याच्या साधारण चार फोडी करतात. कार्टुली कोवळी असली तर त्यात बिया नसतात. पण जर बिया असल्या तर त्या काढाव्या लागतात. ज्या पद्धतीने आपण कारल्याची भाजी करतो तीच पद्धत कार्टुल्यांची भाजी करण्यासाठी वापरावी. लोखंडी थव्यावर शिजवलेली कार्टुल्यांची भाजी अधिक चविष्ट लागते. मात्र कार्टुली कारल्याप्रमाणे कडवट नसतात. पावसाळ्यात अशा कार्टुल्यांची भाजी खूप आवडीने खाल्ली जाते. ही भाजी मूत्रविकारांवर अतिशय गुणकारी आहे. केवळ महिनाभरात कार्टुलीची ही फळे तशीच वेलीवर शिल्लक राहिली तर पिकून तयार होतात. पिकलेली कार्टुली लालभडक किंवा भगव्या रंगाची दिसतात. काही पक्षी या पिकलेल्या फळांतील रस व बिया खातात. पुढील पावसाळ्यात या पडलेल्या बिया रुजतात व नवीन वेलींची रोपे तयार होतात. स्थानिक बाजारातही पावसाळ्यात या रानभाजीला खूप मागणी आहे.