वेत्ये येथील सागरी किनाऱ्‍यावर कासवाची अंडी संरक्षित करण्यात आली आहेत.

Payal Bhegade
02 May 2024
Blog

राजापूर : तालुक्यातील माडबन, वेत्ये येथील सागरी किनाऱ्‍यावर कासवाची अंडी संरक्षित करण्यात आली आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी घरटी आणि अंड्यांमध्ये वाढ झाली असून, दोन्ही ठिकाणी मिळून ३३ घरटी जास्त आणि तीन हजार अंडी जादा आढळून आली आहेत.

संरक्षित केलेल्या वेत्ये येथील घरट्यांमधून कासवाची २५ इवलीशी पिल्ले बाहेर पडली असून, या पिल्लांचा समुद्रातील जीवनप्रवास सुरू झाला आहे. माडबन येथील घरट्यांमधून अद्याप एकही पिल्लू बाहेर पडलेले नाही. वेत्ये आणि माडबनच्या समुद्र किनाऱ्यावर वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली कासवाच्या अंड्याचे योग्य पद्धतीने संवर्धन आणि संरक्षण करण्यात आल्याची माहिती परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश सुतार यांनी दिली.

माडबन आणि वेत्ये किनाऱ्‍यावर ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या समुद्र कासवाच्या मादीकडून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अंडी घातली आहेत. गतवर्षी फेब्रुवारी महिन्यापर्यंत १४ घरट्यांमध्ये १ हजार ७१३ अंडी सापडली होती तर, यावर्षी याच किनारपट्टीवर ४७ घरट्यांमध्ये तब्बल ४ हजार ७९२ अंडी आढळली आहेत.

जंगली श्‍वापदांपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी वनविभागाने विभागीय वनाधिकारी दीपक खाडे यांच्या नेतृत्वाखाली आणि वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली राजापूरचे वनपाल सदानंद घाडगे यांच्यासह वेत्ये येथील कासवमित्र गोकूळ जाधव, माडबन येथील शामसुंदर गवाणकर आदी मेहनत घेत आहेत.